उलटीकडून सुरुवात
A short story by Hari Narayan Apte

[ एक बोधपर लहान गोष्ट. ]
एका विद्वान् ग्रंथकारानें, सृष्टिचमत्कारांविषयीं जगांत पसरलेल्या अज्ञानाबद्दल लिहितां लिहितां असें म्हटलें आहे कीं, 'बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामुळे असंख्य लोकांचे नुकसान झाले आहे.' हे त्या ग्रंथकाराचें लिहिणें संसारकृत्यांत काय किंवा सार्वजनिक कृत्यांत काय, सर्वत्र सारखेच लागू पडतें असें आम्हांला वाटतें. आमच्या वाचकांपैकी पुष्कळांच्या पहाण्यांत, पुढे वर्णन दिले आहे, अशा तऱ्हेचे काही तरी लोक खास आले असतील. बुद्धि पहावी तर चांगली; संवयी चांगल्या; उद्योगीपणा कमी नाहीं; स्थिति चांगली; पाठबळाची वाण नाहीं; सारांश, त्यांनी हातीं घेतलेल्या कार्यात यश येऊन संपत्ति मिळण्याला ज्या म्हणून कांही गोष्टोची जरूरी त्या सर्व उपलब्ध आहेत. परंतु त्यांना कोणत्या गोष्टींत यश म्हणून नाहीं. अर्थातच संपत्ति न मिळता दारिद्र्य व दुःख ही मात्र भोगावी लागतात. अशी मंडळी पाहिली, म्हणजे आपणांस त्यांची फार कीव येते व "अरेरे! बिचाऱ्याचे नशीब ठीक नाहीं त्याला तो काय करणार?" असे उद्वार आपल्या तोंडून निघतात. आपण असें समजतों कीं, यश मिळण्याला जितक्या म्हणून गोष्टींची जरूर तितक्या साऱ्या गोष्टी असून ज्याअर्थी या माणसाला जय मिळत नाहीं, त्याअर्थी त्याचें नशीबच त्याच्या आड येतें; तेथें त्याचा इलाज नाहीं. असें म्हणूनच आपण राहतो असें नाहीं, तर त्या माणसाने आपला उद्योग आतां सोडून द्यावा, त्याला कधीही त्या कामात यश यावयाचे नाही; त्यानें आपलें स्वस्थ बसावें; अशा तऱ्हेचे शब्द आपण त्याच्यादेखत उच्चारून त्याला होईल तितके नाउमेद करतों. परंतु या आपल्या करण्यानें किती नुकसान होतें, याचा अजमास कोणास तरी आहे काय? असल्या आपल्या करण्यानें गरीबगुरीब लोकांची नाउमेद होते, हा भाग तर आहेच. शिवाय आपले बोलणे केवळ मिथ्या असतें. जगांत दुःखी, दुर्दैवी, असे लोक मुळींच नाहीत असें आमचें मुळींच म्हणणे नाहीं, हें जग म्हणजे परमेश्वरानें मानवी प्राण्यांची परीक्षा पाहण्याकरिताच निर्माण केलें आहे, तेव्हां त्यांत दुःखें वगैरे असावयाचींच; परंतु ज्या गोष्टींना आपण दुर्दैव म्हणतों, त्या खरोखर अगदीं अनिवार्य असतात असे मात्र आम्हांस वाटत नाहीं. योग्य विचार केला व योग्य वेळी योग्य उपाय योजिले तर 'दुर्देव' हें नांव पावलेले हजारों प्रसंग मनुष्यांस टाळतां येतील एवढेच आमचें म्हणणें आहे. बाह्यतः पहातां ज्यांना आरंभिलेल्या कार्यात अपयश येण्याला एकही कारण दिसत नाही, ज्यांची संसारयात्रा उत्तम तऱ्हेने चालण्यास एकही अडचण दिसून येत नाहीं; असे लोक जर दुःखांत दिसले तर 'त्यांचे दुर्दैव, त्याला यांचा इलाज काय?' असे मुळींच न म्हणतां, त्यांच्या उद्योगाच्या पद्धतींत, किंवा त्यांच्या स्वभावांत वगैरे कांहीं तरी उणेपणा आहे असें अवश्य समजावें. एकंदरीत, कवीनें अभंगांत म्हटलें आहे तेंच खरें कीं,—
आपुलिया दुःखा । आपुलिया सुखा ॥
कारण तें एका । आपणचि ॥ १ ॥
आपल्या धंद्यांत आपणास योग्य तें यश मिळत नाहीं याचें पुष्कळदां कारण हें असतें कीं, त्या धंद्याला लागणारी नैसर्गिक बुद्धि आपल्याला नसते; परंतु या कारणापेक्षांही दुसरें मोठें महत्वाचें कारण असतें तें हे कीं, हिशोबाठिशोबाच्या कामांत दुर्लक्ष्य असतें, आद्यापेक्षां खर्च जास्त करण्याची संवय लागते. एकंदरीत तात्पर्य हे कीं, लहानसान गोष्टींत सुद्धां जी काटकसर लागते, ती करण्याकडे लक्ष्य नसतें. खर्चाचीं व जमेची तोंडें निदान बरोबर तरी करावीं इकडे लक्ष्य पुरलें नाहीं, पहिल्याचें तोंड मोठे झाले, आणि दुसऱ्याचें चिंबलेलेच राहिलें, म्हणजे असें होतें. बारीकसारीक बाबी असतात, त्याच मोठ्या घातुक असतात. त्या बारीकसारीक आहेत म्हणून आपण तिकडे लक्ष्य देत नाहा आणि "अंः, एवढ्याने काय होणार आहे? करून टाका." असे म्हणून अगदी अनवश्यक ज्याच्यावांचून आपलें कांहीं मोठेंसें अडत नाहीं अशा तऱ्हेच्या गोष्टी घेण्यांत आपण खुशाल पैसा खर्च करतो आणि जरूरीच्या मोठमोठाल्या गोष्टी तर अवश्य कराव्याच लागतात, तेव्हां त्याबद्दल खर्च व्हायचाच. मिळून जमेपेक्षा खर्चाच्या बाबी जास्त होऊ लागतात, आणि अर्थातच बुडत्याचा पाय खोलांत जाऊं लागतो. अन्य पक्षीं जी मंडळी बारीक- सारीक गोष्टीत योग्य काटकसर करून रहातात त्यांचा तोटा मुळींच न होतां कोठेही ती मंडळी गेली, तरी त्यांना सुख मिळून सदा सर्वदा समाधान असतें. पंचवीस रुपये दरमहा मिळविणारा पण काटकसरी व मितव्ययी चोख मनुष्य पाऊणशे रुपये मिळविणाऱ्या परंतु अव्यवस्थित मनुष्यापेक्षां खात्रीनेच जास्त सुखी असतो हा पुष्कळांचा अनुभव आहे. परंतु अशी चर्पटपंजरी हजारों पाने करून आमचें म्हणणें सिद्ध करण्यापेक्षां एकच खरोखर घडलेली गोष्ट सांगितल्यानें वाचकांची आमच्या म्हणण्याविषयीं जास्त खात्री होणार आहे. तेव्हां तसें करतों. एका गांवीं (नांव सांगण्यांत काहीं विशेष नाहीं, सबब सांगत नाहीं.) दोघे नवरा- बायको रहात होतीं. जातीचीं वैश्यवाणी. नवऱ्यानें व्यापाराला सुरुवात केली, तेव्हां आपला असें ह्मणण्यास त्याच्याजवळ एक कपर्दिकसुद्धा नव्हता, असें म्हटलें तरी चालेल; परंतु केवळ उद्योगाने व मितव्ययाने हलके हलके त्यानें दुकान थाटून पुढे आपले आपण लग्न केलें. बायको मिळाली तीही अगदीं नवऱ्याप्रमाणें. वायफळ खर्च करणें, किंवा एखादा जिन्नस विनाकारण व्यर्थ जाऊं देणें तिच्या हातून कधींही घडलें नाहीं. वायां जिन्नस जाऊं देणें म्हणजे तिच्या अगदी जिवावर येत असे. दोघेही नवराबायको अशी एकमेकांस योग्य मिळाल्यावर आणखी काय पाहिजे? त्यांचा धंदा व त्यांचा संसार उत्तम तऱ्हेनें चालूं लागला. त्यांचे वाणसवद्याचेंच दुकान, परंतु तें मोठें थाटदार होऊन सगळ्या गांवांत त्यांचा माल खपूं लागला; दुसऱ्या ठिकाणचा माल कधीं कोणी घेईना. अर्थातच यांच्याजवळ थोडीबहुत माया झाली. पुढे त्यांस एक मुलगा झाला. यांचे दोघांचे वार्धक्य झाले. त्या मुलाच्या गळ्यांत आपला व्यापार घालून आपण स्वस्थ 'शिव शिव' ह्मणत दिवस कंठावे एवढाच काय तो त्यांचा हेतु उरला होता. व्यापाराच्या कामांत काय काय अडचणी येतात आणि त्यांतून पार पडण्याला काय काय उपाय करावे लागतात, ते सर्व त्याला सांगून एकंदरीत आपल्या आजपर्यंतच्या सर्व अनुभवाचे ज्ञान त्याला देऊन- आपण मोकळे व्हावें ही त्यांची इच्छा होती. मुलानेही त्या कामांत आपण पडण्याची आपली इच्छा दर्शविली तेव्हां त्यांस आनंद झाला; परंतु मुलाने एवढेच ह्यटलें कीं, वाणसवद्याचें आपलें दुकान चाललेच आहे. त्यांत आतां नवीन कांहीं करायचे आहे असें नाहीं. तेव्हां शहरातल्या दुसऱ्या कुठल्या तरी भागांत कापडाचे दुकान घालून त्यांत आपली मति घालावी. वृद्ध आईबापांना ते रुचलें नाहीं, तरी पण थोडक्याकरिता आपल्या एकुलत्या एका मुलाची मर्जी कशाला मोडावी! काय एक दोन हजार लागतील, ते आपल्या अल्प पुंजींतून त्याला देऊन दुकान थाटूं द्यावें, आपल्याला आपल्या व्यापारांत यश मिळालें तसें त्याला मिळालें तर हे वाणसवद्याचें दुकान काढून टाकून स्वस्थ बसायला काय हरकत आहे? असा विचार करून यल्लाप्पाला (त्या मुलाला) त्याच्या वडिलांनी कापडचोपड आणून देऊन व कापडबाजारांत चांगलें दुकान पाहून देऊन सुरुवात करून दिली. यल्लाप्पाच्या बापाची साख मोठी, त्यामुळे कधीं मालाची किंवा दुसरी कसली वाण पडली नाहीं. एकंदरीत व्यापारांत पुढे सरसावण्याला जितक्या म्हणून आवश्यक गोष्टी तितक्या सगळ्या त्याला अनुकूल. त्याच्या स्नेह्यासोबत्याना वाटल्याप्रमाणे त्याची व्यापारांत सरशी होण्यास एकही गोष्ट प्रतिकूल दिसली नाहीं. तो स्वतः अगदीं निर्व्यसनी, उद्योगी, शिस्तखोर, कामाकाजाकडे लक्ष्य देणारा; पुनः त्याचा माल चोख व स्वस्ता; देवघेवींत प्रामाणिकपणा पुरा. या सर्व गोष्टींमुळे गिऱ्हाइकी हां हां म्हणतां जुळली आणि सर्वथा त्याची भरभराट चालली आहे असें ज्याला त्याला दिसून आलें. पण काय चमत्कार पहा! दुकान थाटून सुमारें वर्ष सवा वर्ष झालें नाहीं तोंच यल्लाप्यास किंवा त्याच्या वडिलांस म्हटलें तर विशेष शोभेल तें दुकान बंद करावें लागलें. तोच शहाणपणाचा मार्ग असें त्यांस दिसून आलें. आणि गांवांत अशी दाट वदंता पसरली कीं, यल्लाप्पाच्या दुकानांत बराच तोटा आला! सगळ्या चौकस लोकांना मोठे आश्चर्य वाटलें. कारणावांचून कार्य घडत नाहीं, परंतु या ठिकाणीं खास तसें झालें, असें ज्याला त्याला वाटूं लागलें. जगामध्ये आपला धंदा उत्तम प्रकाराने चालविणाराचें उदाहरण द्यायचें म्हणजे लोक यल्लाप्पाचे नांव घेत. तो धाडसी नव्हता, किंवा त्यास एखादी विलक्षण बूड आल्याचेही कधीं कोणाच्या ऐकिवात नव्हतें. तेव्हां त्याच्या बुडीचे योग्य कारण कोणास न दिसल्यामुळे अर्थातच लोकांनी आपले नेहमींचें कारण लाविलें, "बिचाऱ्यान किती साख ठेवली? किती मेहनत केली? पण सर्व व्यर्थ! नशिबापुढे कोणाचे काय चालणार आहे! बरें चला नाहींच येत यश, तर आपलें दुकान बंद केलें हें तरी चांगलें झालें. आतां वडिलांनी मिळविले आहे तेवढ्यावर जरी त्यानें गुजारा केला, तरी पुष्कळ झाले," असें ज्यानें त्यानें म्हणून समाधान मानले. इकडे असें झालें कीं, यल्लाप्पाचें दुकान बंद झाल्यानंतर थोडेच दिवसांनीं यल्लाप्पाच्या आईची एक अतिशय ऋणानुबंधाची मैत्रीण तिला भेटण्यास आली. बोलता बोलतां सहजच दुकानांत आलेल्या तोट्याबद्दल गोष्ट निघाली, तेव्हां अर्थातच ती बाई म्हणते:- "खरंच! नशिबापुढे कांहीं कोणाचं चालत नाहीं तें असं. आज यल्लाप्पाला बूड येण्याला कांहीं तरी कारण! त्याला कोणचं व्यसन नाहीं, त्याला आळस नव्हता, व्यापारात घालायला पैशाची वाण नव्हती कांहीं नाहीं. पण आपलं नाहीं आलं यश! तरी पण तुम्हीं दुकान एकदम बंद उगीच केलं. थोडे दिवस ...." ती बाई पुढे कांहीं बोलणार तोच यल्लाप्पाची आई म्हणते, बाई तुम्हीं पहिल्यानं ह्मणालां तेंच खरं- 'नशिबाच्यापुढे कोणाच्यानं जाववत नाहीं.' त्याचं नशीब कांहीं ठीक दिसलं नाहीं, तेव्हां आम्हीं विचार केला, कीं दुकान ठेवण्यांत काय अर्थ आहे? बंदच करावं ते चांगलं." परंतु या बोलण्यानें त्या दुसऱ्या बाईचें समाधान होईना. खरेंखरें नुकसान येण्याला कारण काय झालें तें कळून यावे अशी तिची इच्छा दिसलो. तें पाहून यल्लाप्पाच्या आईसही आपल्या मैत्रिणीजवळ आपले मन मोकळे करून सांगावें असें वाटलें व ती म्हणाली, सांगूं आतां तुम्हांला त्यांतलं काय आहे तें? यल्लाप्पा अतिशय चांगला, अगदी निर्व्यसनी, उद्योगी, सगळं कांही आहे, पण व्यापार करण्याची हिकमत कांहीं त्याला नाहीं. पैसा मिळविण्याची जरी युक्ति साधली, तरी तो राखण्याची हातोटीसुद्धां पाहिजे! पैशाची किंमत काय असते आणखी पयापयांनीच रुपये कसे होतात, या गोष्टी कांहीं त्याला समजत नाहीत. त्यांतलं सार काय तें हें कीं, त्यानं उलटीकडून प्रारंभ केला!" या शेवटल्या शब्दांचा अर्थ त्या मैत्रिणीस समजला नाहीं. उलटीकडून प्रारंभ तो कसा असतो? तिच्या कांहींच ध्यानांत येईना. तेव्हां तिनें यल्लाप्पाच्या आईस थोडेसें जास्त स्पष्ट बोलण्याविषयीं विनंति केली. त्यावरून यल्लाप्पाच्या आईनें पुढील हकीकत सांगितली. ती यल्लाप्पाच्या स्थितींत असणाऱ्या आमच्या सर्व वाचकांनी अवश्य ध्यानात घ्यावी, अशी आमची त्यांस प्रार्थना आहे. ती ह्मणाली, "हें पहा लिंगुबाई, तिकडे जेव्हां व्यापाराला लागायचं तेव्हां तर काय, पण माझं लगीन झाल्यावरसुद्धा आमच्याजवळ आमचा स्वतःचा असं ह्मणायला एक सुतळीचा तोडा असेल, तर शपथ-आणखी कर्जी द्यायला कोणी स्नेही देखील नव्हता. तेव्हां अर्थातच आमच्या स्थितीला योग्य अशा रीतीनें आह्मी आपला संसार चालवला. नुसत्या भाकरी तर भाकरीच, नुसता हुरडा मिळाला तेवढाच! एखाद्या दिवशीं नुसत्या भाजीवर तर भाजीवर दिवस काढले. पुढे थोडंसं मिळायला लागलं तेव्हां चांगलं कालवण भाकरी करून खाऊं लागलों, आणखी थोडी बरी स्थिति आली तेव्हां थोडंसं दूधदुभतं करूं लागलों, आणखी चांगली स्थिति आली तेव्हां कुठे सणावाराच्या दिवशीं चार इष्टमित्र जमवून गोडगोड खाऊं लागलों. अशा तऱ्हेनं आह्मी चाललों, परंतु यल्लाप्पाने उलटीकडून प्रारंभ केला! त्यानें आरंभीच गोडधोडाला सुरुवात केली! गाडीघोडा घेण्याच्या ऐपतीच्या आधींच गाडी घोडा आला!" यल्लाप्पाप्रमाणे किती तरी तरुण गृहस्थ उलटीकडून प्रारंभ केल्यामुळे बुडतात बरें! मला वाटले नवीन सुरू केलेल्या व्यापारांत बुडालेल्या शेकडा नव्वद किंबहुना पंचाण्णव गृहस्थांना बूड येण्याला कारण अशी 'उलटीकडून सुरुवात' होय.
