रंगोपंतास दत्तोपंताची एकंदर स्थिति काय आहे ती ठाऊक होती, आणि त्याच्या बायकोची त्यास फार कींव येत असे; आजपर्यंत त्यानें आपल्या बायकोकडून अनेक मार्गांनी पार्वतीबाईस मदत केली असेल, परंतु दत्तोपंतास त्याबद्दल कधीच कांहीं वाटलें नाहीं. असो. रंगोपंत वर सांगितल्याप्रमाणे हंसत हंसतच बोलले खरे, परंतु दत्तोपंत अगदीं कुरठून जाऊन तिरस्कारानेच त्याच्याकडे पहात होता. रंगोपंत त्याला त्याच्या आळसाबद्दल व व्यर्थ वेळ घालविल्याबद्दल वारंवार बोले, हें त्यास आवडत नसे. उलट तो वाटेल त्या वेळी आपल्या घरीं येऊन बायकोपाशीं बोलत असतो, आपली मुले त्याच्या घरी जातात, त्याबद्दलही त्यास मोठा राग येत असे. परंतु तसें बोलून दाखविण्याची कांही त्यास छाती नव्हती. कारण रंगोपंताची दानतच तशी विलक्षण होती. आपल्यावर या गृहस्थाचा इतका क्रोध आहे, असें त्या बिचाऱ्या रंगोपंताच्या स्वप्नांतही नव्हतें. दत्तोपंत आपल्या प्रश्नाचें काय उत्तर देतो याची तो वाट पहात होता. इतक्यांत कोपऱ्यांत अगदीं दडून जाऊन बसलेल्या त्या मुलांकडे त्याची दृष्टी गेली. आणि त्याने त्यांस हांक मारली. पण मुले पुढें येईनात. धाकटी मुलगी तर एकसारखी थरथर कापत होती. "ये गणू, ये मथे ये. अशीं दडून कां बसला अगदीं जाऊन? का रे रडतां?" रंगोपंतानें त्यांस विचारले, पण तीं कांहीं केल्या बोलेनात, किंवा जवळही येईनात. रंगोपंत बोलावताहेत तर त्यांच्या जवळ जावें असें अनेक वेळा त्यांच्या मनांत आले असेल, परंतु बापाकडे हळूच पाहिलें असतां त्याची ती क्रूर चर्या पाहून त्यांचे पाऊल जागचें उठेना. ती आपल्या बापाकडे किती भीत भीत, चोरून आणि विलक्षण दृष्टीनें पाहताहेत हे रंगापेंतानें पाहतांच त्यांस त्यांची फारच कीव आली व तो एकदम त्या मुलांजवळ जाऊन म्हणतो, "कां रे रडतां?" एका मुलानें उत्तर दिलें, "कांहीं नाहीं. उगीच" मुलीनें म्हटलें, "भूक लागली. खायला पाहिजे." परंतु हे तिचे शब्द इतके घशांतल्या घशांत आले कीं कांहीं विचारूच नये. ती अगदी लहान, तिला मोठ्या मुलाइतके ज्ञान आलेलें नव्हतें. म्हणूनच ती केवळ खरें होतें तें बोलली. बाकी आपण बोलतों हे बरें करीत नाहीं अशी भीति तिच्याही मनाला वाटली असलीच पाहिजे. कारण ती ती अक्षरें उच्चारतां उच्चारतांच अतिशय भेदरलेल्या डोळ्यांनीं आपल्या बापाकडे पहात होती. काय करणार बिचारी? तिनें जे शब्द उच्चारले ते दत्तोपंताच्या कानी गेले नाहींत म्हणूनच बरं झालें नाहीं तर त्याने तेथल्या तेथे तिची त्रेधा उडवून दिली असती. पार्वतीबाई बिचारी रंगोपंत येण्याबरोबर मर्यादेनें उठून उभी राहिली; व झटकन् अश्रु पुसून दुसरीकडेच पाहूं लागली. आपली दैना कोणास कधी दिसूं नये ही तर तिची मोठी इच्छा; परंतु आपला अपमान तर त्याच्याहीपेक्षां कोणास दिसूं नये. रंगोपंत आल्यावेळेपासून तिला असें वाटत होतें कीं, त्यानें झाला प्रकार खास ऐकिला असावा. रंगोपंत सुजाण माणूस होता. त्यानें ती तिच्या मनाची स्थिति पक्केपणे ओळखली, आणि त्यामुळे तर त्याला तिची अधिकच कीव आली. तो लागलींच दत्तोपंताकडे वळला आणि म्हणतो, "मग कसं काय? मी चाकरी आणली आहे. ती पत्करणार का? पगार वगेरे चांगला बेताचा आहे. एकदा चिकटून राहिला म्हणजे ठीक जुळेल." दत्तोपंत काही केल्या आधी नीट बोलेचना. रंगोपंताने पुनः त्यास विचारले. तेव्हां तो त्रासिक मुद्रा करून म्हणतो, "नाहीं. मला त्या तसल्या नोकरीची मुळींच जरूर नाहीं. मला दुसरें काम लवकरच मिळणार आहे." रंगोपंतास त्या त्याच्या बोलण्याचा किंचित् राग आला, परंतु तो बाहेर न दाखवितां एकदम तो त्यास म्हणतो, "ठीक आहे. दुसरं जास्त फायद्याचं काम तुम्हांला मिळत असेल तर उत्तमच झालं. आमच्या या नोकरीला शेंकडों उमेदवार तयार होतील. मला आपलं वाटलं की, तुमच्या सध्यांच्या स्थितीत तुम्ही कांहीं असली चाकरी हाताची जाऊ देणार नाहीं." नवऱ्याने रंगोपंतास दिलेले उत्तर ऐकून पार्वतीबाईस फार फार वाईट वाटलें. प्रथमतः तिला अशी आशा उत्पन्न झाली होती की, ही चाकरी तरी नवरा हातची न घालवितां जे काय मिळेल त्या थोड्याबहुतांत आपला गुजारा नीटनेटका करूं लागेल; परंतु ती सर्व तिची भ्रांति होती. तिच्याने यावेळी बोलल्यावांचून राहवेना. ती एकदम आपल्या नवऱ्याकडे वळून त्यास म्हणते, 'अहो जा, मी तुम्हांला हात जोडून सांगतें, अशी संधि कांहीं वाया घालवू नका. त्या मेल्या नाटकवाल्याचं काय जातं आहे, फुकट मेहनत करायला आपल्यासारखं माणूस मिळाल्यावर! एक कवडीची तरी त्यांच्यापासून प्राप्ति व्हायची होती! या सोडून आतां हे सगळे नाद, आणखी धरा ही चाकरी!' हे ऐकतांच दत्तोपंताच्या तळव्याची आग मस्तकास जाऊन पोचली आणि एकदम "चल, नीघ. नीघ. तुझी ही रिकामटेकडी टकळी माझ्या मुळींच उपयोगी नाहीं. दुसऱ्याच्या घरांत असेल बायकोचे प्राबल्य. माझ्या घरांत कांहीं तें उपयोगी नाहीं. मला असल्या खरडघाशीच्या नोकरीची मुळींच जरूर नाहीं. मी त्या नाटक मंडळीच्या बरोबर रहाणार, त्यांचीच कामे करणार. कोण मला बोलणार आहे, न् काय बोलतो पाहू दे. पुनः या घरांत पाऊल. घालील तो..... .. जा; मर. तूं आणखी तुझीं तीं कारटी वाटेल तें करा. बायकोनं या तऱ्हेनं बोललेलं मला मुळींच खपायचं नाहीं. हा मी चाललों." इतके म्हणून स्वारी तडाक्यासरशी उठून दाराकडे धांवलीच. पार्वतीबाईस असें झाले का, आपण कोठून काय बोलायला गेलो आणि हें काय झालें! रंगोपंतास या वेळी दत्तोपंताचा विशेषच राग आला असावा असें त्याच्या चर्येवरून दिसले, परंतु तसें कांहीं एक न दाखवितां तो शांतपणे त्यास म्हणतो, "दत्तोपंत, पैसे बिसे मिळण्याची काहीसुद्धां आशा नसतां उगीचच जर त्या नाटकवाल्या मंडळीत जाऊन विनाकारण वेळ घालविणार असलां तर ते काही बरे नाही. तुमच्या घरांत काय स्थिति आहे, याचा विचार करा. ती नाटकवाली मंडळी तुम्हाला काय देणार आहे असं? तुम्ही त्यांच्यासाठी चांगली आलेली चाकरी घालवू नका, पहा तुम्ही आपल्या कर्तव्यांत अगदीं चुकतां आहां. घरच्या मुलांबाळांचे पोट भरा. मग नाटक कंपन्या पहा, की आणखी कांही पहा. पण घरांत बायकामुलें अन्नावांचून मरताहेत, आणखी..." हे शब्द ऐकण्याबरोबर दत्तोपंत सापासारखा खवळून फुसकारे टाकीत रंगोपंताच्या अंगावर धावला आणि ओरडतो, "कोण? तुम्ही कोण? माझ्याशी असलं बोलायला तुम्हांला कोणी अधिकार दिला अं? माझं कर्तव्य काय आणखी मी ते करतों कीं नाहीं हें पाहण्याचा अधिकार तुला दिला कोणी? अरे, आपल्या बायकापोरांचीं पोट जाळतो आहेस तेवढीं पुरे नाहींत का झालीं? दुसऱ्यांची पंचाईत तुला कशाला अं? काय रिकामटेकडे लोक असतात पहा! मला तुझे सगळे कावे ठाऊक नाहींत, समजत नाहीत असं तुला वाटतं होय? पुनः या कामांत जर बोलायला आलास, आणखी माझ्या घरात पाऊल घातलेंस तर तुझी बत्तिशीच पाडून टाकीन." रंगोपंत कांही सामान्य पुरुष नव्हता. दत्तोपंतासारख्या चार किचकट लोकांना त्यानें उडवून दिलें असतें, परंतु आपण या वेळी या माणसाशी मारामारी, हाणाहाणी केली तर, न जाणों गोष्टी भलत्याच पंथाला जायच्या असें त्याच्या मनांत येऊन त्यानें शांति धरली आणि तो स्वस्थ बसला. दत्तोपंताच्या जिभेतच काय तें त्याचें वीर्य होते. ते सर्व खचल्यानंतर तो ताबडतोब त्या मंडळीस तेथें सोडून चालता झाला. रंगोपंतास तर आतां असें वाटलें कीं, अशा स्थितीत या माणसांना सोडून जाणें विशेषच वाईट. त्याने लागलीच त्या दोन मुलांस जवळ बोलाविलें. ती मुले येतांच पार्वतीबाईला तो म्हणतो, "या मुलांना मी घेऊन जातो. आणखी मी आपल्या मुलांबरोबर तुम्हांला थोडेबहुन धान्य लावून देतों. तांदूळ येतांच आधी भात करून खा." पार्वतीबाई कांहींच बोलली नाही. रंगोपंताबरोबर मुलांस मात्र तिनें जाऊं दिले. रंगोपंतानें आपल्या बिऱ्हाडी जातांच आपल्या बायकोस दत्तोपंताच्या घरी झालेली सर्व हकीगत सांगितली. ती ऐकून त्या माउलीचीही दयाबुद्धि फारच जागृत झाली. तिनें त्या दोघां मुलांस आंघोळी वगैरे घालून जेवावयास घातले आणि आपण चांगला यथास्थित शिधा तयार करून गड्याच्या डोक्यावर देऊन ती पार्वतीबाईकडे स्वतः पोचविण्यास निघाली. तिला असे वाटले की, पार्वतीबाई किती केले तरी अस्सलाची आहे. इमानी आहे. ती असे धर्मदायाचे घेण्यास व खाण्यास कबूल होणार नाहीं. तर जाऊन तिला आग्रहानें उठवून अंग धुववून जेवावयास घालावें, या हेतूनें ती माउली पार्वतीबाईच्या खोलीत गेली, तों पार्वतीबाई एकसारखी रडून रडून भुई भिजवीत आहे! तिला उठण्याविषयी आग्रह केला असतां ती उठेना. मोठ्या कष्टाने तिच्याकडून एकदां उत्तर आले, "अहो ते जेवल्यावांचून गेले आहेत. आणखी मी कशी जेवूं! मी नाहीं जेवायची." रंगोपंताच्या पत्नीस पार्वतीबाईस उठवून भात करायला लावण्यास किती तरी श्रम पडले! तेव्हां ती मोठ्या कष्टाने उठली, आणि "अंग धुवून मी भात करते तुम्ही जा," म्हणून तिनें त्यांस आश्वासन दिले. इतके झाले, तेव्हां रंगोपंताची पत्नी तेथून निघाली. पार्वतीबाईसही दोन दिवस पोटांत कांहीं नसल्यामुळे भूक लागलेली होती; परंतु आपला नवरा संतापून कांहीं एक न खाता निघून गेला असतां आपण मात्र यथास्थित जेवणें हे तिच्या मनांत मुळींसुद्धां येईना. तिला असे वाटू लागलें कीं आपण भात करतो तो त्यानें यावं आणि आपण आपल्यासाठी वाढलेले पान त्याचेपुढे ठेवून झाल्या गोष्टीबद्दल त्याची क्षमा मागून त्यास पुनः प्रसन्न करावें या आशेनें ती उठली आणि तिनें चुलीवर भात ठेविला. दत्तोपंत म्हणजे एक निर्लज्जपणाचा पुतळाच होता. तो वर सांगितल्याप्रमाणे निघून गेल्यानंतर तास दीड तास झाला नाहीं तोंच परत आला. पार्वतीबाईनें कांही वेळ त्याची वाट पाहून नुकतेच ताट वाढून घेतलें होतें. आतां शेवटीं आपला नवरा जेवण्यास येत नाहीं असें तिला वाटले. तिनें त्याच्या येण्याची आशा अजिबात सोडून दिली. ती भोजनास बसणार, इतक्यात त्याची पावलें वाजलेलीं ऐकून तिला खरोखरच अतोनात आनंद झाला. ती अस्सल हिंदु होती. अर्थातच तिचे आपल्या पतीवर अगदी निस्सीम असें प्रेम होतें. त्यास पहाण्याबरोबर ती पुढे गेली आणि 'तुम्ही आलात, मला खरोखर समाधान झालें, हा आतांच भात वाढून घेतला आहे, जेवणास बसा,' असे विनविलें, दत्तोपंतास स्वतःपलीकडे कांहीं एक दिसत नव्हते. "तुला आज दोन दिवसांत अन्न नाहीं. तूंच आधीं बस" असें म्हणण्याची दयाबुद्धि त्यास झाली नाहीं. तो त्या पानावर बसला आणि चार घास खातो, तोंच रंगोपंत पुन्हां तेथें आला. रंगोपंताला आपण थोड्या वेळापर्वी किती अपमानकारक शब्द बोललों, आणि त्यांचा किती तरी उपमर्द केला पण शेवटी त्यांच्याच घरून आलेल्या तांदुळाचा भात मुकाट्याने खातों आहों याची दत्तोपंताला अणुरेणूइतकीसुद्धा लाज वाटली नाहीं; इतकेच नव्हे, तर तो खुशाल गोळ्यावर गोळे मारीत होता. करील काय बिचारा? ज्या नाट्यकलोत्तेजक मंडळींना तालमीच्या वेळी व्यवस्था लावण्यास दत्तोपंताची अगदी विलक्षण आवश्यकता होती त्यांना त्याच्या जेवण्याला राहाण्याची मुळींच आवश्यकता वाटली नाहीं. तो आपल्या मनांत खूप समजत होता की, आपण तेथेंच असल्यावर मंडळी जेवणाच्या वेळी आपणांस आग्रह करून ठेवून घेणारच, परंतु तसा प्रकार मुळीच झाला नाही. जेवणाची घंटा होतांच मंडळी जेवण्यास धांवली; परंतु दत्तोपंतास कोणी बोलवीना. तशा तऱ्हेनें दत्तोपंत थोडासा मानी असल्याकारणानें आपण होऊनच 'मीही आज येथें जेवायला रहातों' असे म्हणून आगांतुकी करण्याचे त्याच्या मनांत येईना. शेवटी आपण जाऊन जेवून येतो असें म्हटलें असतां तरी हे कोणी 'कशाला जाता' असें म्हणतील असा विचार करून त्यानें, "चला बोआ आता आम्ही जातोन् जेवून येतों. आता काय काम थोडंच राहिलं आहे. तेव्हांच करून टाकूं?" असें म्यानेजर व दुसरी दोन चार मंडळी होती त्यांच्या देखत म्हटले. तेव्हां म्यानेजर चटकन म्हणतात, 'हो हो जा झटकन या. आणखी येतांना त्या पोलीस जमादारानं दोन तरवारीन् दोन पोषाख देण्याचें कबूल केलं आहे तेवढं घेऊन या. विसरूं नका अं; नाही तर तुम्ही काय फंदी, दुसरीकडे कोठें गुंतला म्हणजे गुंतला, आमची इकडे होईल खोटी. जा, लवकर जाऊन दोन घांस खाऊन आधी तें सामान घेऊन या." बिचाऱ्या दत्तोपंताची शेवटली आशा तुटली. आपण जातो असे म्हटल्यावर तरी आपल्याला हे जेवायला राहून घेतील असें वाटलें होतें; पण तेंही कांहीं जमलें नाहीं. तेव्हां शेवटीं बिचारा अगदीं निराश होऊन तेथून चालता झाला. पण जातो कुठें? "जेवायला आलों, मला जेवायला घाला" असें म्हणावयाचें तरी कसें आणि कोणाला? त्याच्या मनाला वाटले की, रंगोपंतांच्या घरून कांहीं तरी शिधा खास आला असेल, आणि बायको कांही तरी करीत असेल, तेव्हां घरीच जावें नाहीं तर मग पुढचे पुढें पाहतां येईल. असा विचार करून स्वारी आली तो अजमासाप्रमाणे सर्व कांहीं जुळलेलेच होतें. आयताच भात झालेला होता, पान वाढले होते, मग कां कमी करा? ज्याला हमाली काम कर करून त्याचा मोबदला नुसतें जेवण नाटकमंडळीजवळ मागवलें नाहीं, त्यानें आपली दैना पाहून व आपल्या बायकोची कीव करून दुसऱ्यानें धर्म म्हणून पाठविलेले तांदूळ, याथास्थित झोडायला कांहींसुद्धां कमी केलें नाहीं, इतकेंच नव्हे तर बायकोनें दोन दिवसांत अन्न नसतां आपल्यासाठी वाढून तयार केलेले ताट आपल्यापुढे ठेवले असतां कसें जेवूं असें सुद्धां मनांत आलें नाही तेव्हां काय म्हणावें? तो मार गोळ्यावर गोळे चढवीत होता. इतक्यांत रंगोपंत तेथे आला आणि त्याला पहातांच मात्र दत्तोपंतास अगदी पाण्यांत टाकलेल्या ढेकळाप्रमाणे झाले. त्यांत आणखी रंगोपंतानें "पार्वतीबाई, तुम्हीं नाहींच का बसलां आणखी भातय् नाहीं का तुम्हांला उरला?" असें विचारलें. मग काय विचारतां? दत्तोपंताच्या त्या लाजेस संतापाचे स्वरूप आले, आणि तो एकदम म्हणतो, "कांहो तुम्हांला आमच्या घरांतल्या इतक्या चौकशा, तुम्ही कोण? कशाला इथें येतां इतके? कांहीं तुमचं माझं......" पुढे त्याच्यानें बोलवेना. चार घांस भात उरला असेल नसेल तोंच तसाच उठला. ताटाला लाथ मारून तें त्यानें पलीकडे सारलें आणि तुझ्या घरचे तांदूळ आणले वाटतं या चांडाळणीनं. अरे अरे, याच्यापेक्षां नरक खाल्ला असता, तरीसुद्धां इतकं मला वाईट वाटलं नसतं........." पुढें तो आणखी काय बोलला हे आतां मी लिहून वाचकांचीं मने दुखवीत नाहीं; किंबहुना ते लिहून दाखविणें मला शक्यच नाहीं, इतकें तें वाईट होतें. आपण खातों आहोत हे तांदूळ कोणाच्या इथले आहेत, हें त्याला ठाऊक नव्हतें असें नाहीं; तांदूळ तसे आले असतील हें संधान मनांत येऊनच तो मुळीं घरीं धांवत आला, परंतु मघांशी इतकें उपमर्दाचें भाषण बोलून पुनः आपण त्याच्याच घरून आलेले तांदूळ खातों आहोत हें त्यानें स्वतः पाहिले. या गोष्टीबद्दल त्याला संताप आला. तो पुनः सकाळच्याप्रमाणेंच संतापून चालता झाला. ऐन करकरीत तिन्हीसांजांची वेळ, अशा वेळीं आपल्या या भरल्यासरल्या घरांतून नवरा अन्नाला प्रत्यक्ष लाथ मारून बाहेर निघून गेला, हें पाहून बिचाऱ्या पार्वतीबाईस इतके वाईट वाटले, की काही लिहून दाखवितां येत नाही. बायकांचे देवभोळें मन तें. आतां या भयंकर अपशकुनापासून अनर्थापात, संकटे व अरिष्टं आपणावर येणार असे तिला वाटलें, आणि दोन घांस भान भांड्यांत राहिला होता, तो खावा अशीसुद्धां तिला बुद्धि होईना. करते काय बिचारी? दत्तोपंत निघून चालता झाल्यानंतर रंगोपंत फार थोडा वेळ तेथे राहिला. आपला नवरा असली उपमर्दांची बोलणी बोलला, "त्याबद्दल राग मनांत आणू नये, काय बोलावं त्याचा सुमार राहात नाहीं, स्वभाव फार संतापी पडला!" असे तसे बोलून ती अतोनात गहिंवरून फार रडूं लागली. ते त्याच्याने पहावेना. आणि ती एकटी घरांत असतां आपण परक्या पुरुषाने फार वेळ तेथे रहावें हें बरें नव्हे, असेही मनांत येऊन त्याने तेथून पाय काढला. त्या रात्री पार्वतीचाई पुनः जेवली नाहीं हे उघडच आहे. तिचा मुलगा मात्र तिला सोबत म्हणून आला. मुलगी रंगोपंताच्या घरीच निजली. इकडे दत्तोपंताची स्वारी संतापांत बाहेर पडली, ती फुत्कारे टाकीत असतांच त्यांना कोणी हांक मारली आणि "काय दत्तोपंतदादा, आज आम्ही किती वेळ तुमचा शोध करितो आहों, तुम्ही कोठे भेटलांच नाही. आपल्याला आज नेलं पाहिजे तालमीला. आपल्याखेरीज आमचा शिरकाव होणार कसा?" असे म्हटले. मग काय विचारता? दत्तोपंतदादांचा संताप उतरून ते ताबडतोब खुलले व "छे छे, बोआ, मी फारजणांना कबूल केलें आहे; तुम्ही आधी भेटला असता तर पाहावलं असतं. आतां कांही सोय नाहीं. आतां पुढल्या तालमीच्या वेळी नाहीं तर खेळाच्या वेळों पाहीन." असे आढ्यतेने म्हणून गर्दीगर्दीने पुढेच चालले. तरी तो इसम त्यांच्या पाठोपाठ धांवतोच आहे, त्यांच्या विनवण्या करतोच आहे, असा प्रकार चालला होता. त्यामुळे तर स्वारी फारच खुलून गेली व शेवटी "बरं बरं, माझ्याबरोबर चला. त्या जमादाराकडून दोन पोषाखन् दोन तलवारी, बंदुका वगैरे सामान न्यायचं आहे ते घेऊन जायला, म्हणजे आयतेच आंत चलाल." त्या गृहस्थास दत्तोपंताचे केवढे तरी उपकार वाटले आणि तसें त्यानें बोलून दाखविलें; मग काय विचारतां? दत्तोपंतास नुसती अगदी धन्यता झाली. त्या रात्रीं दत्तोपंताच्या विनवण्या किती तरी लोकांनी केल्या असतील की आम्हांला तुम्ही आंत घ्या. आणि तितक्याजणांना सबबी सांगून घालवून देण्यास किंवा उपकार केल्याप्रमाणे आंत घेण्यास दत्तोपंतांस किती तरी प्रयास पडले. "काय लोक असतात बोआ! आतां 'नाही तरी किती लोकांना म्हणू, आणखी घेऊं तरी कोणाकोणाला?' छे, छे, इथून पळून जाण्याची पाळी आली" असे उद्गार त्यांनी कितीदा तरी काढले असतील, आणि ते उद्गार काढतांना त्यांनी कितीदा तरी आपल्या इतर स्नेह्मांकडे पाहून आढ्यतेने डोळे मिचकविले असतील. पण घरी आपली बायको कोण्या स्थितीत असेल, ती जिवंत आहे की मेली, याचे त्याला स्मरणसुद्धां झालें नाहीं.
पार्वतीबाई विचारी तळमळत पडली होती. तितक्यांत तिच्या मुलाला एकाएकी काहीं होऊन तो झोपेत मोठ्याने किंचाळून उठला. पार्वतीबाई अर्थातच घाबरली; आणि "गणू अरे गणू, गणू, काय झालं रे?" असे त्याला विचारू लागली; परंतु तो उत्तर देईना, एकसारख्या किंचाळ्या फोडीत होता. तिने विचारतां विचारतां शेवटी मोठ्या कष्टानें त्याच्याकडून तिने काढलें कीं, त्याच्या पोटात दुखत होतें. तो अगदी गडबडा लोळूं लागला. त्याला ते पोटांतले वेठ सहन होईनात. तिनं त्याला सुंठ दिली! मोहरी पोटावर घातली परंतु व्यर्थ. त्याचें लोळणें, त्याचे किंचाळणे मुळींच बंद होईना. तास झाला, दोन तास झाले, पण त्याच्या दुखण्याचा, लोळण्याचा व ओरडण्याचा जोर अधिकच वाहत चालला, तेव्हां शेवटीं कोणाला तरी हांक मारून आणून कोणी डॉक्टर, वैद्य वगैरे पहाण्याला काय करावें तें तिला सुचेना. अशा वेळींसुद्धां नवरा घरीं नाहीं, याबद्दल तिला अतोनात वाईट वाटलें. नवरा जेथें असेल तेथें जाऊन त्याला एकदां बोलावून आणावें असें मनांत आलें. हक्कानें दुसऱ्या कोणाला बोलावून आणणार? काय होईल ते होईल. एकदां जावेंच असे मनात पक्के करून ती उठली. शेजारींच यशोदाबाई म्हणून एक वृद्ध विधवाबाई रहात होती. तिच्याकडे ती प्रथम गेली, आणि 'कृपा करून माझ्या मुलाजवळ बसा. मी जाऊन तिकडे बोलावून आणतें' असें विनवून व यशोदाबाईस जवळ बसवून ती तेथून गेली. नेहमीं नाहीं तर नाहीं, पण आज तरी त्यांना अशी स्थिति सांगितली म्हणजे ते घरी येतील आणि कोणी वैद्य, डाक्टर बोलावून आणतील असे तिला वाटलें. नवऱ्याची नाटकमंडळी कोठें उतरली आहे हे तिला अजमासानें ठाऊक होतें. रंगोपंताला त्रास देणें हें तिला बरें वाटलें नाहीं. आणि म्हणून ती स्वतःच त्या नाटकमंडळीच्या दाराशी अजमासाने गेली तों नाटकाची तालीम संपून आमंत्रित मंडळी जाऊन खाशी मंडळी मद्यपानाचा धिंगाणा घालीत होती. पार्वतीबाई दाराशी गेली इतक्यांत कोणी इसम बाहेर आला. त्याला बोलावण्यात सांगावें, पण कोणास म्हणून सांगावें! नाव कसे घ्यावें, आंत कसें जावें? तिला कांहीं सुचेना. "अहो, गणू अगदी अत्यवस्थ आहे, गडबडा लोळत आहे. तुमची बायको तुम्हाला बोलवायाला आली आहे." असं जाऊन आंत सांगाल का? असें तिनें विचारलें. गृहस्थ पशु होता; त्यानं "बाई आंत पन्नास मंडळी बसली आहे तितक्या सगळ्यांना हा निरोप सांगू का?" असे म्हणून "हो: हो: हो:" करून हंसत हंसत आंत जाऊन सगळ्या मंडळींत त्यानें तो निरोप मोठ्यानें सांगितला. त्यांत थोडीं माणसें होतीं, तीं हंसली नाहींत, पशु होते ते हंसले. दत्तोपंत समजला, आणि आपलीच बायको कांहीं तरी निमित्त काढून आली असावी असें वाहून तो उठला. त्याची एकानें तितक्यांत "तुमची मंडळी वाटतं?" असे म्हणून इतरांकडे डोळे मिचकावत टवाळी केली. त्यामुळे तर त्याला बायकोचा फार संताप आला. या गृहस्थाचा राग यावा तो एकीकडेच राहिला. राग आला तो बायकोचा. आणि बाहेर जाऊन तिचें म्हणणें काय आहे ते मुळींच न ऐकता तो तिला अद्वातद्वा बोलला. थोडासा आधीं तर्र झाला होता- त्यामुळे तर त्याच्या जिभेस सुमारच राहिला नाहीं. तू माझी फजिती करायलाच आली आहेस. चालती हो. तुझा माझा संबंध नाहीं. मरूं दे कारटा मेला तर. तूही मर त्याच्या मागोमाग आणखी ती कारटी मरू दे म्हणजे मी सुटलों. पुनः त्रास नको. चालती हो. दाराशी उभीसुद्धां राहूं नकोस, पुनः मला तुझें तोंड सुद्धां बघावयास नको. मी आतां तिकडे कधीसुद्धां येणार नाहीं. असें म्हणून झटक्यासरसा तेथून तो निघून आंत चालता झाला. पार्वतीबाईला बिचारीला काय वाटले असेल? तिची केवढी निराशा झाली! तिला आतां सर्व त्रिभुवन आठवले आणि ती मुंगीच्या पावलाने तेथून परत चालती झाली. काय करणार! ज्यांच्याकडे जाणे तिच्या अतोनात जिवावरच आले होते, त्यांच्याकडे जाणे शेवटी भाग पडलें. दुसरा मार्गच राहिला नाहीं. रंगोपंताचे उपकार आतांपर्यंत किती तरी झाले. तेव्हां त्यांचे आणखी किती उपकार करून घ्यायचे असें तिच्या मनास वाटले, परंतु दुसरें गत्यंतर नव्हते. रंगोपंतास तिच्या मुलाची स्थिति कळली, तेव्हां तो लागलाच धांवत येऊन काय करावयाचे ते त्यानें ताबडतोब केले. डॉक्टर आणला, त्याची ओषधे झालीं, परंतु त्या मुलाच्या पोटदुखीला कांहीं उतार म्हणून पडेना. डॉक्टराने तर स्पष्ट सांगितलें की, "या मुलाची दोन चार दिवस उपासमार होऊन यानें एकदम फार खाल्ल्याकारणाने हा विलक्षण विकार याला झालेला आहे आणि त्यांत याला वेळीं औषध मिळाले नाही. हा यांतून जगेलच असे खात्रीने सांगतां येणार नाहीं." वैद्याचे म्हणणे त्याच प्रकारचें पडलें. तेव्हां कोणी तिला पंचाक्षरी वगैरे पहावा अशाबद्दल सुचविलें, ती तर अगदी वेडीच झालेली. तिला काय, ती पंचाक्षरी पहाण्याला धावाधाव करूं लागली, परंतु पंचाक्षरी पैशाखेरीज हलेना. रुपये दोन मागू लागला; पण रुपये आणणार कोठले? रुपये कोठून मिळतील? कोणाजवळ मागावे? कांहीं तिला सुचेना. शेवटी इकडे तिकडे विचार करतां करतां तिला असे सुचलें कीं, आपल्या गळ्यांत एक जाळीचा मणी आहे. हा मणी नवऱ्याच्या तडाक्यांतून कसा वांचला- तिनें आजपर्यंत कसा वांचविला हे तिचे तिलाच ठाऊक; पण आज पोरासाठी त्या मण्यावर रुपये आणण्याचा तिनें विचार केला, आणि तिच्या बिऱ्हाडापासून कोणी मावशीबाई बायाबापड्यांशी देवघेव करीत असे, तिच्या येथें जाऊन तिनें तो मणी देऊन दोन रुपये आणले. ते घेऊन ती घरों चालली होती तो वाटेंत तिच्या दारापासून दहा पावलांवर दत्तोपंत भेटले, त्यांनी "काय आहे? कुठे गेली होतीस? मी घरांत यायला न् तुला बाहेर जायला एकदमच फावतं नाहीं का? कुठे गेली होतीस?" असे दरडावून विचारलें. इतक्यांत आपल्या हातचे रुपये वाजून त्यांना समजतील या भीतीनें तिनं ते लपविण्याचा प्रयत्न केला, तो ते वाजलेच आणि त्याला समजलेच. त्याबरोबर तो चवताळून पुनः म्हणतो, "त्या रंगोपंताकडे? काय आणलं आहेस ते हातांत? रुपये? रंगोपंताकडून आणलेस वाटतं? अं, अं? त्या रंगोपंताकडून? माझा तो दुस्मान त्याच्याकडून! आण ते, टाक, टाक ते रुपये" असें म्हणून त्या पशुनं तिचा हात मुरगळला, आणि रुपये घेऊन चालता झाला. त्यास दोन रुपयांची त्या वेळीं जरूरच होती, यामुळे ते प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपल्यास पाठवून दिले असे त्यास वाटून त्यानें त्यांजवर झडप घातली आणि बहिरी ससाण्याने चिमणीवर झडप घालून जसा प्रकार करावा तसा त्यानें केला. आणि त्या दोन रुपयांची जी वासलात लावावयाची होती ती लावण्याकडे त्याने आपले चित्त लाविलें. बायको त्या दोन रूपयांचा काय उपयोग करणार होती, आणि आपल्या मुलाची अवस्था काय आहे हे त्याच्या स्वप्नांतरीं तरी कांहीं यायचें होतें! पार्वतीबाईची आतां अगदी निराशा झाली आणि ती आपली घरांत मुलाजवळ चसली. मुलाची प्रकृति फारच बिघडत चालली होती. प्रथम एक दोन दिवस शेजारणीपाजारणीनी येऊन बसून तिला हात सोडवणूक केली, पण आतां घटको-घटकी कोण काय करणार? ती आणि तिची मुलगी यांखेरीज तिसरें माणूस सतत बसण्याला कोण येणार? रंगोपंतांची बायको फार चांगली माउली होती, ती वारंवार येऊन तिचें समाधान करी. परंतु मुलाला बरें पडेना आणि लोकांच्या नुसत्या समाधानानें तिला काय वाटणार? त्यांतही तिला राहून राहून असें वाटे को, आपला नवरा जवळ नसावा आणि आपल्यावर असला दुर्धर प्रसंग यावा हे आपलं केवढे दुर्भाग्य! आतां आपण जागचे हलूं नये; कांहीं उपाय करूं नये, परमेश्वराचा धांवा करीत मुलाजवळ स्वस्थ बसून रहावें याखेरीज दुसरा मार्ग नाहीं. हाच तिनें निश्चय केला आणि कोणी शेजारणीपाजारणीने आजारी मुलासाठीं म्हणून कांहीं आणून दिले तर ते त्याला व मुलीला घालून, आणि आपणही शिळेपाके खाऊन त्या मुलाची शुश्रूषा चालविली. याप्रमाणे एकंदर सहा दिवस गेले, मुलाला विशी एकोणिशी कांहीं नाहीं आणि तिची स्वतःची प्रकृति फारच बिघडेल असें वाटू लागलें. दत्तोपंत त्या सहा दिवसांत मुळींच घरी आला नाहीं. लाज सोडून कोणी न बोलावतां, आपणच आमंत्रण लावून मंडळींत तुकडे मोडूं लागला. घरी आल्यास घरांत 'नकार घंटा' हे त्यास ठाऊकच होते. पुढच्या शनिवारी त्या नाटकमंडळीच्या नव्या खेळाचा पहिला प्रयोग करण्याचे ठरले. तेव्हां दत्तोपंताच्या जिवाची नुसती धांदल! पंक्तीला जेवतो, तेव्हां त्याच्यापासून वाटेल तितकें काम चोपून घेणें हे आपले अगदीं कर्तव्य असें समजून म्यानेजर मंडळी त्यास वाटतील ती कामे सांगून तीं त्याजकडून करूनही घेऊ लागली. शनिवारी कांहीं नवीन सीनरी उभी करावयाची होती, आणि नवीन पडदे चढवावयाचे होते, तेव्हां तें काम दत्तोपंतांना त्यांनी सांगितले आणि दत्तोपंतांनी मोठ्या आनंदाने ते पतकरिलें व हुरूपाने पार पाडण्यास सुरुवात केली. परंतु दुर्दैव आपले कोणतेंही कृत्य कांहीं पूर्वी सांगून सवरून करीत नाहीं. त्याच्या मनांत दत्तोपंताच्या हुरुपाचा भंग करावयाचा होता तो त्याने केला. पडदा चढविण्यासाठी अवघड जागीं चढलेल्या दत्तोपंताचा पाय घसरून तो एकदम खाली रंगभूमीवर पडला तो बेशुद्धच पडला. तशा स्थितीत दत्तोपंताचा मंडळीस काय उपयोग? आतां अर्थातच त्यांना त्याची मोठी पीडा वाटून त्याला शुद्धीवर आणण्याच्या भानगडींत सुद्धां न पडतां त्यांनीं त्याला त्याच्या बिऱ्हाडी नेऊन पोचविलें, आणि कोणी तरी डॉक्टर पाठवून देतो म्हणून मंडळी निघून गेली. ती पुनः कशाला कोण तोंड दाखविणार आहे? आपल्या नवऱ्याची तशी ती भयंकर स्थिति पाहून पार्वतीबाईच्या तोंडचे पाणी पळालें. आपल्या मुलाचे दुखणे सुद्धां ती विसरली आणि एकदम दत्तोपंताच्या शुश्रूषेस लागली. रंगोपंत तिला या प्रसंगी फारच उपयोगी पडला. गणूस वांचविणे कांहीं त्याच्या हातचे नव्हतें. तो एक दोन दिवसांतच वारला. त्याचा रोग आंतड्यांसंबंधी असून असाध्यच होता. परंतु दत्तोपंतास नीट स्थितीवर आणण्यासाठी त्याने उपायांची आणि तिनें शुश्रूषेची पराकाष्ठा केली. मात्र दत्तोपंतास त्यांतले कांहीं सुद्वां समजलें नाहीं. तो चांगला आठ दिवस तसा बेशुद्ध होता. पुढे शुद्धीवर आल्यावर त्यास गणू वारल्याचे समजलें, त्यामुळे त्यास आपल्या पशूसारख्या आचरणाचा फार पश्चात्ताप झाला; आणि बायकोनें ज्या पुढे दोन महिने त्याच्या खस्ता खाल्या त्यांनी तर तो अगदी जिंकलाच गेला. तो दोन महिन्यांनी चांगला बरा झाला. पण त्याच्या एका पायांत चांगलाच अधुपणा राहिला आहे. रंगोपंताची किंमत त्यानें त्या दुखण्यांत ओळखली आणि आज त्याच्याच अनुग्रहामुळे तो आपल्या सद्गुणी बायकांमुलांसह आपला गरिबीचा संसार श्रीमंतापेक्षाही सुखासमाधानाने हांकत आहे. गणूची आठवण मात्र त्यास कव्हा केव्हां फार दुःख देते.